स्वतंत्र तेलगण राज्याचा मुद्दा आता कमालीचा चिघळला असून एकसंध आंध्रप्रदेश कायम ठेवण्याची मागणी करीत मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी याप्रकरणी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ते मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिल्यानंतर किरण कुमार रेड्डी यांनी राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली आहे.
स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीबाबतचे विधेयक मंजूरीसाठी मांडण्यात आल्यानंतर सीमांध्र भागातील कॉंग्रेस खासदारांनी संसदेत गोंधळ घातला. या विधेयकाच्या विरोधात झालेल्या गदारोळाच्यावेळी सभागृहात मिरपूड फेकल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कॉंग्रेसने विधेयकाला विरोध करणाऱ्या आपल्या खासदारांना पक्षातून निलंबित केले आहे.
तेलंगण विधेयकाचा हा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नसतानाच आता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनीही एकसंध आंध्रप्रदेश राज्य कायम ठेवण्याची जोरदार मागणी केली.तसेच तेलंगण विधेयकाचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. रेड्डी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा मंगळवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, स्वतंत्र तेलंगण राज्याच्या निर्मितीच्या निषेधार्थ आपल्या समर्थकांसह सोमवारी संसदेच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या वायएसआरचे नेते जगन मोहन रेड्डी यांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले.