Telangana Election 2018: तेलंगणात एमआयम नेते आणि असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. आपल्या प्रक्षोभक भाषणांमुळे नेहमीच चर्चेत असणारे अकबरुद्दीन यांना भाजपा उमेदवाराचा पराभव करत सलग पाचव्यांदा आमदारकी मिळवली आहे. चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून ते निवडणूक लढवत होते. आधी हैदराबादमध्ये येणारा हा मतदारसंघ विभाजनानंतर तेलंगणाचा भाग झाला.

अकबरुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात भाजपाने शहजादी सय्यद यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपाने खेळलेलं मुस्लिम कार्ड फायद्याचं ठरलेलं नाही. दुसरीकडे टीआरएसने सीता रेड्डी यांना उमेदवारी दिली होती. दोघांचाही पराभव करत अकबरुद्दीन ओवेसी यांनी विजय मिळवला आहे.

दरम्यान तेलंगणात टीआरएसने आघाडी घेतली असून भाजपाचा मोठा पराभव झाला आहे. तेलंगणात एकूण ११९ जागांसाठी मतदान झाले होते. त्यासाठी २,८०,७४,७२२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. ७ डिसेंबर रोजी इथे मतदान झाले होते.

तेलंगणात टीआरस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. ते सध्या ८२ जागांवर आघाडीवर असून टीडीपी-काँग्रेस युतीला २५, भाजपा ६ तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तेलंगणात पुन्हा एकदा टीआरएस-एमआयएमची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.