जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ने रचला आहे. हा कट उद्धवस्त करण्यासाठीच काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्याचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणेतील एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी निमलष्करी दलाचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले होते. यानंतर राज्यात लागू असलेल्या संविधानातील कलम ३५ अ आणि ३७० हटवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, या चर्चेचे खंडन करताना गुप्तचर यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरिक्त जवानांची तैनाती ही आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. कारण, पाकिस्तानच्या ISIने १५ ऑगस्ट रोजी काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचला असून याची माहिती आपल्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या माहितीनुसार, सध्या खोऱ्यात फुटिरतावाद्यांच्या कारवाया थंडावल्याने त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा हल्ल्याचा कट रचण्यात आला आहे.

या अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय तपात पथकाने (एनआयए) काश्मीरमध्ये फुटिरतावाद्यांच्या घरांवर छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये घट झाली असून यामुळे पाकिस्तान बैचेन झाला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी घातपाताचा कट रचला जात आहे.

एनआयएने रविवारी सकाळी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात फुटिरतावाद्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. एनएनआयने सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार ठिकाणी छापे टाकले होते. हवाला नेटवर्क आणि पाकिस्तानातून होणाऱ्या टेरर फंडिंग प्रकरणात सामील असल्याच्या संशयातून गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी सातत्याने छापेमारी सुरु आहे.