आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये असलेल्या एका पाठ्यपुस्तकात मशिद ध्वनी प्रदुषणाचा एक स्त्रोत असल्याचे दाखवण्यात आल्याने सोशल मीडियावर चांगलाच वाद निर्माण झाला. अनेक नेटिझन्सही ही बाब निषेधार्ह असल्याचे मत नोंदवले, ज्यानंतर प्रकाशकाने माफी मागत हे चित्र या पाठ्यपुस्तकातून हटविण्याचे आश्वासन दिले. सेलिना पब्लिशर्सने विज्ञानाच्या एका पाठ्यपुस्तकात ध्वनी प्रदूषण कशामुळे होते, याची चित्रे दाखवली आहेत. त्यात मशिद दाखवण्यात आल्याने वाद ओढवला होता.

मशिदीचे चित्र दाखवून त्यापुढे एक माणूस आपल्या कानावर हात ठेवून त्रासदायक अवस्थेत उभा आहे असे चित्रात दाखवण्यात आले आहे. ट्रेन, कार, विमान आणि मशिद या सगळ्यांमुळे ध्वनी प्रदूषण होते असेही या पुस्तकात म्हणण्यात आले आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला असून आता सोशल मीडियावर हे पुस्तक मागे घेण्यासाठी एक ऑनलाईन याचिकाही सुरू करण्यात आली आहे. आयसीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र प्रकाशक हेमंत गुप्ता यांनी हे चित्र मागे घेण्यात येईल असे म्हणत माफी मागितली आहे. यापुढील आवृत्तीमध्ये हे चित्र असणार नाही असे आश्वासन गुप्ता यांनी दिले आहे. तसेच आम्ही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत असेही त्यांनी आपल्या माफीनाम्यात स्पष्ट केले आहे.

एप्रिल महिन्यातच गायक सोनू निगमने अजान ऐकल्याने माझी झोपमोड होते असे ट्विट केले होते. ज्यानंतर त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला होता. त्यानंतर सोनू निगमने मुस्लिम समाजाची माफी मागितली होती. तो वाद विस्मरणात जातो न जातो तोच आता या पाठ्यपुस्तकातल्या चित्रामुळे नवा वाद सोशल मीडियावर रंगताना दिसून आला आहे. या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत का? याची चौकशी करण्याची मागणीही नेटिझन्सकडून होताना दिसते आहे. तसेच आयसीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया का दिलेली नाही? असाही प्रश्न विचारण्यात येतो आहे.

याआधीही इतिहासाच्या पुस्तकात काही चुकीचे संदर्भ छापले गेल्याची बाब समोर आली आहे. आता विज्ञानाच्या पुस्तकात ध्वनी प्रदूषण ज्यामुळे होते त्यापैकी एक म्हणजे मशिद असल्याचे दाखवण्यात आले आहे. या गोष्टीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.