थायलंडमधील सरकार समर्थक आणि विरोधक यांच्यातील तणाव उत्तरोत्तर वाढतोच आहे. देशाच्या राजधानीत आणीबाणी लागू केल्यानंतरही पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांना पदभ्रष्ट करण्यासाठी सुरू असलेले निषेध मोर्चे थांबलेले नाहीत. उलट देशाच्या इशान्य भागात सरकार समर्थक ज्येष्ठ राजकीय नेत्याची हत्या झाल्याने सरकार समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

२०१० मध्ये बँकॉकमध्ये मोर्चे काढणाऱ्या आणि ‘रेड शर्ट’ चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्वांचाय प्रैपाना यांची बुधवारी हत्या करण्यात आली. अज्ञात बंदुकधाऱ्यांनी त्यांना उडोन थानी येथील त्यांच्या निवासस्थानी गोळ्या घातल्या. यामागे राजकीय हेतू असावेत, अशी शक्यता स्थानिक पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात आतापर्यंत नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर किमान १५० जण जखमी झाले आहेत.

आंदोलकांची मागणी
‘पीपल्स कौन्सिल’ या प्रत्यक्ष निवडून न आलेल्या गटाकडे सत्तेची सूत्रे सूपूर्द करण्यात यावीत, तसेच २ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या निवडणुका रद्द करण्यात याव्यात, अशी विरोधकांची मागणी आहे. यिंगलुक शिनावात्रा यांच्या शासनाविरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले असून, त्या आपले बंधू आणि २००६ मध्ये पदभ्रष्ट करण्यात आलेले थायलंडचे माजी पंतप्रधान ठकसेन शिनावात्रा यांच्या आदेशाबरहुकूम चालत असल्याचा आरोप केला जात आहे.