पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता तिथले राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस व टीएमसीवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

“पश्चिम बंगालमधील विधनासभा निवडणूक लढवणार असल्याचं आम्ही जाहीर केल्यानंतर, एकेकाळी काँग्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅण्ड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी टीम म्हणणं सुरू केलं. ममता बॅनर्जी देखील असंच म्हणत आहेत. मी एकमेव आहे ज्याच्याविषयी ते बोलू शकतात? मी कुणाचाही नाही पण जनतेचा आहे.” असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.

आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार असल्या, तरी पश्चिम बंगाल निवडणुकीचे पडघम कधीच वाजू लागले आहेत. तृणमूल काँग्रेस अध्यक्ष व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याचे दिसत आहे.

ममतांना आणखी एक धक्का: तृणमूलच्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या घोषणेआधीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. काही महिन्यांपासून तृणमूलचे नेते भाजपाची वाट धरताना दिसत आहेत. त्यात आता आणखी पाच नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांच्या उपस्थित कमळ हाती घेतलं. दिल्लीत या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपाला आणखी राजकीय बळ मिळालं आहे. तर तृणमूल काँग्रेस आणखी एक हादरा बसला आहे.