१२ वर्षापर्यंतच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास नराधमाला फाशीची शिक्षा होणार या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडेल्या बैठकीत हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या प्रस्तावानुसार १२ वर्षापर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा, १२ ते १६ वर्षापर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास १० ते २० वर्षांची शिक्षा मंजूर करण्यात आली आहे. तसेच बलात्काराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढली जावीत यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब झाले आहे.

कठुआ, उन्नाव आणि सुरत येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनांनी सगळा देश सून्न झाला. बलात्काऱ्यांना फाशीच दिली पाहिजे अशी मागणी याआधी अनेकदा करण्यात येत होती. यावेळी मात्र ही मागणी अत्यंत जोरकसपणे करण्यात आली. या तिन्ही घटनांचे पडसाद देशातील प्रत्येक राज्यात उमटले. अशात केंद्र सरकारने विचार विनिमय करत १२ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीचीच शिक्षा देणार असल्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे आठ वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असून संताप व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही कठुआ बलात्काराची चर्चा सुरु आहे. अल्पवयीनांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य लोक करत होते त्या मागणीवर विचार करून केंद्राने अखेर आपला निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकार यासाठी पॉस्को कायद्यात आवश्यक ते बदल करणार आहे, त्या प्रक्रियेला सुरुवातही करण्यात आली आहे.