शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे अभिनेत्री दीपिका पदुकोन हिच्या समर्थनात उतरले असल्याचे दिसत आहे. “अभिनेत्री आणि तिच्या चित्रपटावर बहिष्काराची मागणी करणे चुकीचे आहे. देश तालिबानी पद्धतीने चालवता येणार नाही.” असे संजय राऊत यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थांना मारहाण झाल्याची घटना घडली होती, यानंतर दीपिका पदुकोन हिने जेएनयूमध्ये जाऊन येथील विद्यार्थांच्या भावना समजून घेतल्या होत्या, तेव्हापासून तिला भाजपासह अन्य काही संघटनाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांनी देखील दीपिकावर टीक करत तिच्या ‘छपाक’ या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे हा चित्रपट वादात सापडला आहे.

तर दुसरीकडे दीपिकाने जेएनयूला भेट दिल्याबद्दल अन्य संघटनांकडून तिचे कौतुक देखील केले गेले आहे. काहींनी डाव्या विचारसरणीला पाठिंबा दिल्याबद्दल तिच्यावर टीका केली. तर काहींनी हा केवळ छपाक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला स्टंट असल्याचे म्हणत तोंडसुख देखील घेतले आहे.

दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली. विद्यार्थी तरुणांबरोबरच विविध क्षेत्रातील लोक रस्त्यावर आले. या आंदोलनांवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी  ट्विट करून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राऊत यांनी एक शेर ट्विट केला असून, “जे तुम्ही दडपून टाकण्याचा प्रयत्न करत होता, ते आता रस्त्यावर आलं आहे,” असं म्हटलं आहे.