कर्नाटकातील एका जवाहिऱ्याचे एक कोटी रुपये लुटणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक झाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सैय्यद अल्ताफ यालाही वाशी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ३३ लाख रुपये हस्तगत केले असून सर्व आरोपींकडून आतापर्यंत ८१ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
आठवडाभरापूर्वी वाशी टोल नाक्यावर एका बसमधून हवाल्याची एक कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या मोहम्म्द सलीम या सोने व्यापाऱ्याला वाहनातून खाली उतरण्यास सांगून ट्रॉम्बे पोलिसांनी सलीम याच्या मित्राकरवी एक कोटीची रक्कम लुटण्यात आली. नंतर सलीम याला उरण येथील खाडीत फेकण्यात आले. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. चौकशीनंतर या लुटीत पोलिसांचाच हात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक जनार्दन राजे, पोलीस उपनिरीक्षक पंकज खरनार आणि नीलेशकुमार सुरेश संदानशिव यांना अटक करण्यात आली.