गुजरातमधील निवडणुकीत भाजपचे नेते काँग्रेसवर तुटून पडल्याचे चित्र आहे. मात्र, गुजरातच्या एका मंत्र्यांनी चक्क राहुल गांधींची बाजू घेत स्वपक्षालाच खडसावत घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस इतरांच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबूड करत नाही. त्यामुळे भाजपनेही काँग्रेसवर दादागिरी करु नये, असे या मंत्र्याने म्हटले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया मात्र उंचावल्या आहेत.

गुजरातचे मत्सपालन मंत्री पुरुषोत्तम सोलंकी यांनी काँग्रेसच्या अनेक बाबींचे उघडपणे समर्थन केले आहे. भाजपकडून काँग्रेसवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप केला जातो. यावरुनही सोलंकी यांनी काँग्रेसची पाठराखण केली असून हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याने भाजपने यात हस्तक्षेप करु नये असे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपमध्ये कोणाला तिकीट दिले जावे किंवा नाही याबद्दल राहुल गांधींनी आक्षेप घेतला का ? मग तुम्ही असे का करता, अशा शब्दांत त्यांनी भाजपला खडसावले.

भाजपने घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला लक्ष्य करावे का, या प्रश्नाला उत्तर देताना सोलंकी म्हणाले, हे चुकीचे आहे. आपण माझ्याकडेच पहा, जो ताकदवान आहे त्याला भाजप हातदेखील लावत नाही. मात्र, जो कमजोर आहे, लढू शकत नाही त्याच्याविरोधात दादागिरी केली जाते, असा आरोपही त्यांनी केला .

घोघा विधानसभा मतदारसंघातून १९९८पासून सलग जिंकत आलेले आमदार सोलंकी पुढे म्हणाले, पाच वर्षांनंतर मी माझ्या मुलाला ११० टक्के राजकारणात लॉन्च करणार आहे. त्यावेळी भाजपला त्याला समर्थन द्यावेच लागेल. जर भाजपला भावनगरमधील ९ जागा जिंकायच्या असतील तर त्यांना माझ्या मुलाला तिकीट द्यावेच लागेल अन्यथा मी निवडणूक प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.