जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे आज सकाळी सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या दहशतवाद्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. मे महिन्यात भारतीय लष्कराचे अधिकारी लेफ्टनंट उमर फैयाज यांच्या हत्या प्रकरणात या दहशतवाद्याचा समावेश होता.


इशफाक पड्डेर असे या मृत दहशतवाद्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबाचा स्थानिक संघटक होता. त्याच्यावर अनेक नागरिकांच्या हत्येचे आरोप आहेत. याबाबत ‘एएनआय’सह लष्कराच्या उत्तर कमांडने आणि दक्षिण काश्मिर पोलिसांच्या पोलिस उपमहानिरिक्षकांनी ट्विटद्वारे माहिती दिली. ‘एएनआय’च्या माहितीनुसार, या चकमकीनंतर शोपियन आणि कुलगाम भागातील मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.

लष्करी अधिकारी फैयाज यांचा मृतदेह बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी झालेल्या अवस्थेत शोपियन जिल्ह्यातल्या हरमन भागात आढळून आला होता. ते आपल्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी येथे आले होते. त्यावेळी त्यांचे अपहरण करून त्यांना हरमन चौकात आणून ठार करण्यात आले होते. यामध्ये दहशतवादी पड्डेर याचा सहभाग होता. अखेर भारतीय सैन्यासोबत झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा झाला.

श्रीनगरजवळ काल रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही तासांनंतर हा हल्ला झाला. या हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता, यामध्ये इतर तीन जण जखमी झाले होते.