भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीं यांची २०१४ च्या निवडणुक प्रचारसमिती प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. मात्र, नरेंद्र मोदींच्या या वाटचालीमध्ये पाच व्यक्तिंचा मोठा वाटा आहे. नरेंद्र मोदींना कुणाचे पाठबळ आहे?
के. कैलैशनाथन, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव
सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी असलेले कैलाशनाथन १९७९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते गुजरात विधानसभेच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आहेत. मोदींची सर्व प्रशासकीय कामे कैलाशनाथन पाहतात. औद्योगिक क्षेत्र आणि गुजरात सरकार यांच्यामधील दुवा म्हणून त्यांची ओळख आहे. जागतिक गुंतवणुकदारांचे लक्ष गुजरातकडे वेधण्यासाठी ‘व्हायब्रंट गुजरात’सह मोदींच्या सर्व प्रमुख कार्यक्रमांचे व्यवस्थापन त्यांनी केले आहे.

अमित शाह, भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी
गुजरातचे माजी गृहमंत्री असलेल्या अमित शाह यांना सोहराबुद्दीन शेख आणि तुलसिराम प्रजापतीच्या खोट्या चकमकीत केलेल्या हत्ये प्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे मोदींना शाह यांना परत मंत्री मंडळात घेता येणार नसले तरी त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची काळजी घेण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे आगामी लोकसभेच्या निवडणुकीतील महत्व लक्षात घेऊन शाहा यांची वर्णी या मोठ्या राज्याच्या प्रभारी पदी लावण्यासाठी मोदींनी आपले राजकीय बळ वापरले होते. यातून मोदी आगामी लोकसभेची निवडणुक अटलबिहारी वाजेयींच्या लखनौ मतदार संघामधून लढवणार असे नवे तर्कवितर्क समोर आले.

आनंदीबेन पटेल, आमदार
शहर, रस्ते आणि निवास विकास मंत्री असलेल्या आंनंदीबेन पटेल गुजरातच्या मंत्रीमंडळातील मोदींच्या अतिशय जवळच्या कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रीय राजकारणामध्ये मोदींना भविष्यात मोठी संधी मिळाल्यास आनंदीबेन गुजरातच्या भावी मुख्यमंत्री असतील असे सर्वज्ञात आहे.

हिरेन जोशी, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी
आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले जोशी मुख्यमंत्री कार्यालयातील सोशल मिडिया सांभाळतात. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिका-याचा दर्जा देण्यात आला आहे. मोदींच्या सोशल मिडिया सेलचे काम पाहण्यासाठी जोशींनी २००० स्वयंसेवकांची फळी कार्यरत केली आहे.

परिंदू भगत, सनदी लेखापाल(सीए)
सीए असलेले भगत मोदींच्या विश्वासातील पक्ष कार्यकर्त्यापैकी एक आहेत. ते भारतीय महसूल विभागात अधिकारी होते.