करोनापासून बरं होण्याचं देशातील रुग्णांचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे, मृत्युदरही कमी आहे, अशी माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना रविवारी दिलासा दिला.

मोदी म्हणाले, “आता युद्ध केवळ सीमेवरच लढलं जात नाही, देशातही लढलं जातं. त्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका ठरवावी लागेल. मागील काही महिन्यांपासून देशानं एकजुटीन करोनाचा सामना केला. त्यामुळे अनेक शंका चुकीच्या ठरवल्या गेल्या. करोनापासून बरं होण्याचं देशातील रुग्णांचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे, मृत्युदरही कमी आहे. मात्र, करोना अजूनही तितकाच घातक आहे, जितका सुरूवातीला होता. त्यामुळे काळजी घेणं हेच आपलं शस्त्र आहे”

करोनाचा धोका अद्याप टळला नसल्याने आपल्याला अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल लावणे, दोन फूटांचं अंतर राखणं, सातत्यानं हात धुणं, कुठेही थुंकू नये, स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष देणं हेच आपले शस्त्रं आहेत जे आपल्याला करोनापासून वाचवू शकतात. जर तुम्हाला मास्क लावल्यामुळे अडचण वाटत असेल तर क्षणभर त्या डॉक्टरांचं आणि नर्सेस आणि करोना योद्ध्यांचं स्मरणं करा, असा सल्लाही यावेळी मोदींनी देशवासियांना दिला.

सकारात्मक दृष्टीकोन संकटातही संधी देईल – मोदी

सकारात्मक दृष्टीकोनच आपल्याला कायम संकटातही संधी देईल. सध्याच्या करोनाच्या काळात देशातील तरुण-तरुणींनी टॅलेंड आणि स्कीलच्या जोरावर नवे प्रयोग सुरु केले आहेत. बिहारमध्ये ‘वुमन सेल्फ हेल्प ग्रुप’ने मधुबनी पेंटिंग असलेले मास्क बनवायला सुरुवात केली आहे. पाहता पाहता हे खूप प्रसिद्धही झालंय. ईशान्य भारतात बांबू मोठ्या प्रमाणावर आढळतो. याच बांबूपासून त्रिपुरा, मणिपूर, असाममधील कुशल कारागीरांनी उच्च दर्जाची पाण्याची बाटली आणि जेवणाचे डब्बे विकसित केले आहेत. लडाखमध्ये चूली नवाचं फळ मिळतं तर कच्छमध्ये शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती करतात, यामध्ये ते विविध प्रयोग करीत आहेत, अशी उदाहरणं देत मोदींनी यावेळी जनतेला आत्मनिर्भर होण्याचा संदेशही दिला.