आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून देण्यात येणारा २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे. एक कोटी रुपये, प्रमाणपत्र आणि पारंपारिक हस्तकला शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राम सुतार यांच्यासह मणिपुरी शास्त्रीय नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह यांना २०१४ या वर्षासाठीचा तर बांगलादेशातील छायानौत या सांस्कृतिक संस्थेला २०१५ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार जाहीर झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची नावं निवडली आहेत अशी माहिती समोर आली आहे. या समितीत चीफ जस्टिस ऑफ इंडिया रंजन गोगोई यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारने रविंद्रनाथ टागोर यांच्या दीडशेव्या जयंतीपासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे.

कोण आहेत राम सुतार?
राम सुतार हे जागतिक किर्तीचे शिल्पकार आहेत. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ते शिल्प निर्मिती करत आहेत. त्यांच्या कलेतील योगदानासाठी त्यांना २०१६ मध्ये पद्मभूषण आणि १९९९ मध्ये पद्मश्री या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या शिल्पांसह अनेक शिल्पांची निर्मिती त्यांनी केली आहे. एवढंच नाही तर फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या ठिकाणीही त्यांची शिल्पं पोहचली आहेत. भारतातले दिग्गज शिल्पकारांपैकी एक अशी त्यांची ख्याती आहे.