पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर करण्यात आला असून राफेल डीलप्रकरणी झालेला घोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे मोदींवर आता फौजदारी खटला दाखल करण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राफेल डीलप्रकरणी विमाने बनवणारी फ्रान्सची कंपनी डसाँ एव्हिएशनला फायदा मिळवून देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचा गैरवापर झाला असून याद्वारे सरकारी तिजोरी लुटण्याचा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यामुळे पंतप्रधानांवर आता फौजदारी खटला दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे मोदींपासून सुरु झालेल्या या भ्रष्टाचाराच्या खेळाचा शेवट त्यांच्यावरील कारवाईनेच होणार आहे, असे ट्वीट राहुल गांधींकडून करण्यात आले आहे.

राफेलप्रकरणाची काही कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरी गेली असल्याचे केंद्र सरकाने सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. यावरुन सरकार चोरांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असून जे खरं बोलत आहेत त्यांना तुरुंगात टाकण्याचे काम करीत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. पुरावे नष्ट करण्याचा आणि सरकारच्या गंभीर चुकांवर पांघरुन घालण्याचा हा प्रकार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

‘द हिंदू्’च्या वृत्ताचा संदर्भ देताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरी म्हणाले, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या इंडियन निगोशिएटिंग टीमने हे स्पष्ट केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारतीय करदात्यांना राफेल विमांनासाठी अधिक कर भरण्यासाठी जबरदस्ती केली. यामागील साधे गणित म्हणजे, राफेल विमाने मूळ किंमतीपेक्षा अधिक किंमतींना खरेदी करण्यात येणार असल्याने याचा फायदा मोदी आणि डोभाल यांना होणार आहे. तसेच मोदींनी आपल्या जवळच्या व्यापारी मित्रांसाठी हा घाट घातल्याचेही इंडिअन निगोशिएटिंग टीमच्या माहितीवरुन कळते. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड आहे, असा आरोप येचुरी यांनी केला आहे.