तीन मातापिता असलेल्या (एक आई, एक जनुक दाती स्त्री व एक पुरूष यांच्यापासून झालेले मूल) मुलांना जन्म देण्यास परवानगी देणारा कायदा ब्रिटनमध्ये मंजूर करण्यात आला आहे. यात तीन व्यक्तींच्या डीएनएपासून मानवी गर्भ तयार करून बालकाला जन्माला घातले जाणार आहे. व्यंग असलेली मुले जन्माला येण्याचे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये हा कायदा २८० विरुद्ध ४८ मतांनी संमत करण्यात आला त्यामुळे बाह्य़ पात्र फलन कायद्यात आता आमूलाग्र बदल होत आहे. दात्याकडून घेतलेल्या मायटोकाँड्रियस डीएनएचे फलन करण्यास त्यामुळे रुग्णालयांना परवानगी मिळणार आहे.  
  आरोग्य मंत्री लॉर्ड होवे यांनी सांगितले की, कुटुंबानी या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कारणासाठी करावा. यात आम्ही तज्ज्ञ समितीच्या शिफारशी विचारात घेऊनच निर्णय घेतला आहे. कॅथॉलिक व अँगलिकन चर्चनी याला विरोध केला आहे. हा निर्णय घाईने घेतला असून मनोवांच्छित संततीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे.