त्रिपुरा आणि नागालँडमधील स्पष्ट बहुमतानंतर भाजपा आता देशातील २१ राज्यांमध्ये भाजप आणि एनडीए सत्तेत आहे. त्यामुळे भाजपाचे अखिल भारतीय स्वरुप समोर आले आहे. ईशान्य भारतातील मोदींच्या विकासाच्या अजेंड्याला मतदारांनी साध दिली आहे, अशी प्रतिक्रीया भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

शहा म्हणाले, भाजपाने ईशान्य भारतात दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी केलेल्या कामामुळेच हा विजय मिळाला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही ही तिसरी निवडणूक जिंकली असून आता कर्नाटक आमचे पुढचे लक्ष्य आहे. या राज्यांमध्ये डाव्यांचा दारुन पराभव झाला असून डावे आता भारतातील कोणत्याच भागासाठी योग्य नाहीत हे सिद्ध झाले आहे , असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आल्यानंतर ईशान्य भारतात शांतता राखण्यासाठी प्रयत्न झाले. इथल्या लोकांना शांतता हवी आहे त्यांना हिंसाचारातून बाहेर यायचे होते त्यामुळे त्यांनी भाजपला साथ दिली. इथल्या जनादेशाने मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपावर विश्वास ठेवला त्यामुळेच भाजपाचा येथे मोठा विजय झाला. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने जगात नावलौकिक मिळवला, महागाईवर नियंत्रण मिळवले तसेच देशाच्या सीमाही सुरक्षित केल्या आहेत, असे शहा यांनी यावेळी सांगितले.

शहा म्हणाले, जोपर्यंत ओडीशा, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाजपाचे सरकार येत नाही तोपर्यंत भाजपाचा सुवर्णकाळ सुरु होणार नाही. ईशान्य भारतातील या विजयामुळे आम्हाला २०१९च्या निवडणुकांसाठी आत्मविश्वास मिळणार आहे.