विजयी उमेदवारांना पराभूत घोषित केलं असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आता केला आहे. इतकंच नाही तर नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेवर दबाव टाकत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हीच तक्रार घेऊन राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं एक शिष्ट मंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहचलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे मतमोजणीच्या प्रक्रियेवर दबाव टाकत आहेत असा आरोप या शिष्टमंडळाने केला आहे.

काय म्हटलं आहे तेजस्वी यादव यांनी?

निवडणूक आयोगाने दिलेली यादीच तेजस्वी यादव यांच्या राजदच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की मतमोजणी पूर्ण झालेल्या ११९ जागांचे निकाल हाती आले आहेत. ज्या ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार जिंकले आहेत तिथे त्यांना विजयाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. मात्र आता त्यांना सांगण्यात येतं आहे की तुम्ही हरले आहात आणि विजयाचं प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो आहे. विशेष बाब म्हणजे इलेक्शन कमिशनच्या वेबसाइटवरही महाआघाडीच्या या उमेदवारांना विजयी दाखवण्यात आलं आहे. मात्र त्यांना प्रमाणपत्र नाकारण्यात येतं आहे आणि हे सांगितलं जातं आहे की तुमचा पराजय झाला. लोकशाही ही अशी लूट चालणार नाही.

हिलसा विधानसभा मतदारसंघातून राजदचे उमेदवार शक्ति सिंह यांना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने ५४७ मतांनी जिंकल्याचं घोषित केलं होतं. मात्र आता त्यांना प्रमाणपत्र नाकारण्यात आलं. त्यासाठी थोडी वाट बघा असंही सांगण्यात आलं. त्यानं मुख्यमंत्री निवासातून एका फोन आला. ज्यानंतर अचानक निवडणूक अधिकारी म्हणू लागले की पोस्टल बॅलेट रद्द झाल्याने तुम्ही १३ मतांनी हरला आहात. हे असे प्रकार ११९ पैकी अनेक जागांवर घडताना दिसत आहेत असंही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.