एकवीस वर्षीय मंयक प्रताप सिंह हा तरुण विधी सेवा परीक्षा २०१८ उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे तो आता देशातील सर्वात तरुण न्यायाधीश म्हणून कोर्टाचे कामकाज पाहणार आहे. २१ व्या वर्षीच तो आता कोर्टात निकाल सुनावणार आहे. या अभुतपूर्व यशासाठी त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

मयंक सिंह हा राजस्थानच्या जयपूर येथील रहिवासी आहे. आपल्याला कायमच कायद्याच्या सेवा आणि समाजात न्यायाधीशांना मिळणाऱ्या आदराचे आकर्षण होते. त्यामुळे न्यायाधीश होण्याचे माझे स्वप्न होते ते मी या परीक्षेद्वारे पूर्ण केले आहे.

मयंकने सन २०१४ मध्ये राजस्थान विद्यापीठातून पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. त्याचा हा कोर्स याच वर्षी पूर्ण झाला आहे. या यशामुळे मला स्वतःचाच अभिमान वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. यासाठी त्याला कायमच प्रोत्साहन देणारे कुटुंब, शिक्षक आणि शुभचिंतकांचे त्याने आभार मानले आहेत. मयंक आता कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी देखील एक प्रेरणास्त्रोत बनला आहे.

सन २०१८ पर्यंत विधी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्याची वयाची किमान वयोमर्यादा २३ वर्षे होती. मात्र, २०१९ मध्ये राजस्थान हायकोर्टाने ही मर्यादा २१ वर्षे केली. परीक्षेची वयोमर्यादा घटवण्यात आल्यानेच आपण या परीक्षेला बसू शकलो असे मयंकने म्हटले आहे. या संधीमुळे मी वेळेपूर्वीच बऱ्याच गोष्टी शिकू शकेन असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.