राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) प्रक्रिया देशभरात अंमलात आणली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले. या पार्श्वभूमीवर जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांनी सरकारला इशारा दिला आहे. एनआरसी संपूर्ण देशात लागू करण्यात आली, तर शेजारील देशांबरोबरचे आपल्या देशाचे संबंध ताणले जातील, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपा सरकारने परिणामांना लक्षात घेतलेले नाही. त्यांना संपूर्ण देशात ‘एनआरसी’ लागू करायची आहे. जर याची अंमलबाजणी झाली तर शेजारील देशांबरोबर असलेले आपले संबंध ताणले जातील. आसाममध्ये काय झाले पाहा, कटू अनुभवांमधून शिकण्याची आवश्यकता आहे.” असे देवेगौडा यांनी म्हटले आहे.

शहा यांनी देशव्यापी एनआरसी प्रक्रियेचे सूतोवाच केलेले असतानाच, आपण आपल्या राज्यात ही प्रक्रिया होऊ देणार नाही, असे आश्वासन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी लोकांना दिले आहे. तर, कुणाचाही धर्म लक्षात न घेता भारताच्या सर्व नागरिकांचा राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादीत समावेश केला जाईल, असे शहा यांनी राज्यसभेत सांगितले. याचबरोबर इतर धर्माच्या लोकांचा या यादीत समावेश करण्यात येणार नाही, अशी कुठलीही तरतूद एनआरसीमध्ये नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

धार्मिक अत्याचारांमुळे पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान सोडून गेलेल्या हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती, शीख व पारशी या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळावे, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे शहा म्हणाले होते. राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) प्रक्रिया देशभर पार पाडली जाईल. कुठल्याही धर्माची व्यक्ती असो, तिने काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येकाला एनआरसीत समाविष्ट करण्याची ही केवळ प्रक्रिया आहे, असे शहा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.