बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, राजकीय वातावरण अधिकच तापण्यास सुरूवात झाली आहे. याशिवाय बिहारमधील प्रमुख पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनं देण्यास सुरूवात झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या तरूणांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आपले सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत दहा लाख तरुणांना नोकरी देण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

“पहिल्याच कॅबिनेटमध्ये पहिल्या स्वाक्षरीने बिहारच्या १० लाख तरूणांना नोकरी देणार. बिहारमध्ये ४ लाख ५० हजार रिक्त पदं पहिल्यपासूनच आहेत. शिक्षण, आरोग्य, गृह विभागसह अन्य विभागांमध्ये राष्ट्रीय सरासरीच्या मानकांनुसार बिहारमध्ये अद्यापही ५ लाख ५० हजार नियुक्त्यांची आवश्यकता आहे.” असे तेजस्वी यादव यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

तेजस्वी यादव सातत्याने बिहारमधील तरूणाईच्या मुद्यांवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करत आले आहेत. आता निवडणूक जवळ आलेली असल्याने त्यांनी पुन्हा एकदा तरूणाईचा मुद्दा समोर केला आहे. त्यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट रोजी बेरोजगारीच्या मुद्याला घेऊन आम्ही एक पोर्टल तयार केले आहे. ज्यामध्ये ९ लाख ४७ हजार ३२४ बेरोजगारांनी नोंदणी केली आहे. तर, १३ लाख ११ हजार ६२६ जणांनी मिस कॉल केला आहे. आमचा पक्ष बेरोजगारीच्या मुद्याला घेऊन अतिशय गंभीर असल्याचेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

मागील वेळी २०१५ मध्ये नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून सत्ता मिळवली होती. त्यात लालूंच्या पक्षाला सर्वाधिक ८० जागा मिळाल्या होत्या. जनाता दल ७१, भाजप ५३ तर काँग्रेस २७ जागा मिळाल्या होत्या.