देशभरात आज शिक्षक दिन साजरा होत असताना एका जाहीर कार्यक्रमात मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जर गुरुंच्या समोर टाळ्या वाजवल्या नाही तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची चिन्हे आहेत.


मध्य प्रदेशचे शिक्षण मंत्री कुंवर विजय शाह असे या मंत्र्याचे नाव असून शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, पहा आमचे सहकारी टाळ्या वाजवत नाहीत तर केवळ टाळ्या वाजवण्याचे नाटक करतात. गुरु हा ईश्वरापेक्षाही मोठा असतो, जर गुरुच्या सन्मानार्थ आपण टाळ्या नाही वाजवल्या तर पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवाव्या लागतील.

भाजपाच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा भाजपाच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे मुंबईतील भाजपाचे आमदार राम कदम यांनी नुकत्याच झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना विरोधकांसह जनतेच्या मोठ्या रोषाला समोरे जावे लागले. जाहीर कार्यक्रमात उपस्थित तरुणांसमोर ते म्हणाले होते की, तुम्हाला जर एखादी मुलगी आवडत असेल आणि त्याला तुमच्या आई-वडिलांची परवानगी असेल तर मला येऊन सांगा त्या मुलीला आपण पळवून आणू.

त्याचबरोबर यापूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी एक अवैज्ञानिक वादग्रस्त विधान केले होते. बदकांच्या पाण्यात पोहोण्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या विधानामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले होते. त्यापूर्वी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी असेच अवैज्ञानिक आणि वादग्रस्त वक्तव्य केले होते. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खोटा असून मानवाची उत्पत्ती माकडांपासून झाली नसल्याचा ठाम दावा त्यांनी केला होता. यावरुन त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.