मुंबईवर 26/11 सारखा भीषण हल्ला झाला. यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी वायुदल एअर स्ट्राईक करण्यास सज्ज होतं. मात्र यूपीए सरकारने त्यांना संमती दिली नाही. आम्ही मात्र उरी आणि पुलवामा या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा आणि शहीद झालेल्या जवानांचा बदला घेतला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कन्याकुमारी या ठिकाणी झालेल्या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच देशसेवेसाठी सतत झटणाऱ्या जवानांना मी वंदन करतो असंही ते म्हटले आहेत.

आपल्या देशात एक काळ असा होता की त्यावेळी बातम्या येत की सैन्याला बदला घ्यायचा आहे. मात्र यूपीए सरकार त्यांना संमती देत नसे. आज परिस्थिती तशी नाही. आमच्या सरकारने सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याचा बदला ते जशास तसं प्रत्युत्तर देऊन घेऊ शकतात. मुंबईत जेव्हा 26/11 चा हल्ला झाला त्यामागेही पाकिस्तानचा हात होता. पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी आणि एअर स्ट्राईक करण्यासाठी वायुदल सज्ज होते. मात्र त्यांना यूपीए सरकारने संमतीच दिली नाही त्यामुळे इच्छा असूनही ते काहीही करू शकले नाहीत. आम्ही मात्र जनभावना ओळखून सैन्याला पूर्ण मोकळीक दिली. दहशतवादी जर हल्ला करतील तर त्यांना भारत सोडणार नाही हा संदेश आता पोहचतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना घडल्या आहेत त्यानंतर सैन्यदलाने जी कारवाई केली आहे ती वाखाणण्याजोगी आहे,  असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. दहशतवाद विरोधी कारवाईसाठी पूर्ण जग भारताला साथ देत आहे मात्र देशातले काही पक्ष असे आहेत जे दहशतवादाविरोधात आम्ही जी कारवाई करतो आहोत त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत असंही मोदींनी म्हटलं आहे.