काश्मीरमधली संचारबंदी कायम आहे त्यामुळे भारतासोबत चर्चा होणार नाही असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद 370 हटवल्याने पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. त्यावरुन रोज नवी वक्तव्यं करणाऱ्या इम्रान खान यांचे आणखी एक वक्तव्य आता समोर आले आहे. ” जम्मू काश्मीरमध्ये संचारबंदी आहे तोपर्यंत भारताशी काश्मीर प्रश्नी चर्चा करणार नाही ” असं आता इम्रान खान यांनी स्पष्ट केलं आहे.

 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावरुन अण्वस्त्र हल्ल्याची भीती व्यक्त केली. त्यावरुन आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा समाचार घेतला. शाह म्हणाले, “वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात भगवान राम आणि समुद्र देवता यांच्यात झालेल्या संभाषणावरून एखादे भयानक युद्ध कसे असू शकते हे आपण शिकू शकतो. एखाद्या महिलेच्या सन्मानासाठी सुद्धा युद्ध होऊ शकते म्हणून एखाद्या महिलेचा सन्मान किती महत्वाचा आहे, हे देखील आपल्याला कळते.” यासाठी शाह यांनी समुद्रकिनार्‍यावर रामाने केलेल्या तीन दिवसांच्या प्रार्थनांचा उल्लेख केला.

दरम्यान काही वेळापूर्वीच इम्रान खान यांचे वक्तव्य समोर आले आहे. काश्मीरमधली संचारबंदी जोपर्यंत उठवली जात नाही तोपर्यंत या मुद्द्यावर भारताशी चर्चा करता येणार नाही असे इम्रान खान यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. इम्रान खान यांचा आडमुठेपणा कायम असल्याचंच त्यांच्या उत्तरातून समोर आलं आहे.

पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी काश्मीरच्या अनुच्छेद 370 बाबत विचारले असता, ” काश्मीरमध्ये संचारबंदी लागू आहे तोपर्यंत या प्रश्नावर भारताशी चर्चा शक्यच नाही ” असं उत्तर इम्रान खान यांनी दिलं आहे. दरम्यान पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि लवकरच त्यावर ताबा मिळवू असे वक्तव्य मंगळवारीच केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी इम्रान खान यांचे आडमुठे वक्तव्य समोर आले आहे.