डेव्हिड कॅमेरून पायउतार; ब्रेग्झिटसाठी वाटाघाटीचे आव्हान

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे थेरेसा मे यांनी स्वीकारली असून त्या मार्गारेट थॅचर यांच्यानंतर दुसऱ्या महिला पंतप्रधान ठरल्या आहेत.  ब्रेग्झिटच्या वादळात डेव्हिड कॅमेरून पायउतार झाल्यानंतर कुठल्याही मुद्दय़ावर कठोर भूमिका घेण्याची तयारी असलेल्या मे यांची हुजूर पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती. ब्रेग्झिटसाठी वाटाघाटी सुरू करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

युरोपीय संघातून ब्रिटन बाहेर पडल्यामुळे तेथे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला. युरोपशी सहकार्यातूनच व्यापार, सुरक्षा या क्षेत्रात प्रगती शक्य आहे, असा माझा उत्तराधिकाऱ्यांना सल्ला आहे, असे डेव्हिड कॅमेरून यांनी पार्लमेंटमधील शेवटच्या भाषणात सांगितले.  कॅमेरुन यांनी ब्रेग्झिटच्या विरोधात भूमिका घेतली होती व युरोपीय संघात ब्रिटनने राहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांना खासदारांनी उभे राहून मानवंदना दिली. जी कामगिरी पदावर असताना केली ती चांगलीच होती. सहा वर्षांच्या सत्ताकाळात अनेक चांगले क्षण आले, असे ते म्हणाले. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये त्यांनी खासदारांच्या प्रश्नांना शेवटची उत्तरे दिली व निरोप घेतला.

मन लावून एखादी गोष्ट केली तर राजकारण व समाजकारणात काही अशक्य नसते, असे कॅमेरून यांनी या वेळी सांगितले.

  • मे यांच्या कारकिर्दीत ब्रेग्झिट समर्थक असलेल्या भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार हे उघड झाले आहे.
  • अ‍ॅम्बर रूड, जस्टीन ग्रीनिंग व कॅरेन ब्रॅडले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.