कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आठ दिवसांची मुदत मागितली असली तरी भाजपकडे स्पष्ट बहुमत नसल्यामुळे, नक्की कोण सत्ता स्थापन करणार याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. राजकीय तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या शक्यता व्यक्त होत असून, नक्की काय होईल हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. या सगळ्या चित्रामध्ये काय होऊ शकेल, या विषयीचा एक आढावा..

> जनता दलाने मुख्यमंत्री आमचा हवा अशी मागणी केली आणि भाजपने ती मान्य केली तर भाजप सत्तेत राहील, पण ही शक्यता कमी आहे.

> भाजपचा मुख्यमंत्री असेल तर जनता दल पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे.

> भाजप बहुमत सिद्ध करू शकत नसेल तर दुसऱ्या पक्षांना म्हणजे काँग्रेस आणि जनता दलाला संधी देण्यात येईल.

> दोन्ही पक्षांनी युती केली तर जनता दलाचा मुख्यमंत्री होण्यास काँग्रेसने होकार दर्शवला असल्यामुळे या युतीचे सरकार सत्ता स्थापन करेल.

> सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण देण्यात येऊ शकते. भाजप जनता दलाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करू शकेल.

> काहीही झाले तरी सत्ता स्थापन करायचीच व काँग्रेसला सत्तेत येऊ  द्यायचे नाही असा चंग भाजपने बांधला व विरोधक फोडायचे ठरवले तर पक्षांतर बंदी कायदा असल्यामुळे किमान एक तृतीयांश आमदारांनी पक्षांतर करावे लागते, जे इतक्या मोठय़ा संख्येने होणे शक्य दिसत नाही.

> तरीही भाजपला सत्ता स्थापन करायचीच असेल तर ते विरोधी पक्षांच्या काही विजेत्या उमेदवारांना आपल्याकडे वळवून राजीनामा द्यायला सांगू शकतात. समजा ८ ते १० जणांनी आमदारकीचा राजीनामा दिला तर भाजप बहुमताचा आकडा विद्यमान आमदारांच्या संख्येत गाठू शकते. आणि फेरनिवडणुकीमध्ये या राजीनामा दिलेल्या आमदारांना सामावून घेऊ  शकते.