काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढविला. भाजप जातीय विद्वेषाला खतपाणी घालत असून त्यांच्या या विद्वेषाच्या राजकारणामुळे देशाच्या रचनेला बाधा पोहोचत आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे अशा प्रकारच्या विद्वेषाचेच बळी ठरले असून कदाचित त्यांच्याप्रमाणेच आपलीही हत्या केली जाईल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरपूर येथे गेल्या महिन्यांत जातीय दंगलीचा उद्रेक झाला होता. त्या भागाला भेट देऊन आपण हिंदू आणि मुस्लीम यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांच्या मुखातून त्यांच्या शब्दांतच आपल्याला स्वगाथा ऐकावयास मिळाली, असा भावनिक सूरही राहुल गांधी यांनी आळवला.
मुझफ्फरनगरमधील नागरिकांच्या दु:खात आपल्याला स्वत:चा चेहरा दिसला आणि म्हणूनच आपल्याला भाजपच्या राजकारणाचा तिरस्कार आहे. मुझफ्फरनगर, गुजरात, उत्तर प्रदेश आणि काश्मीरमध्ये ते आग लावत बसणार आणि तुम्हाला आणि आम्हाला ती आटोक्यात आणत राहावी लागणार. या प्रकारांमुळे देशाचे नुकसान होते, असेही राहुल गांधी म्हणाले.
आपली आजी (इंदिरा गांधी), आपले वडील (राजीव गांधी) यांची हत्या करण्यात आली आणि कदाचित भविष्यात आपलीही हत्या होईल, मात्र त्याची आपल्याला पर्वा नाही, आपल्याला जे वाटते त्या भावना व्यक्त केल्या, असे सांगून राहुल गांधी यांनी भाजपच्या राजकारणाला सडकून विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पंजाबमधील एक आमदार काही दिवसांपूर्वी आपल्याला कार्यालयात येऊन भेटला. आपली २० वर्षांपूर्वी भेट झाली असती तर संतापाच्या भरात आपण तुम्हालाही ठार केले असते, असे त्या आमदाराने आपल्याला सांगितले. कोणीही संतप्त होऊ शकतो, हा संताप जाणूनबुजून लोकांमध्ये भिनविला जातो, राजकीय नेते आणि स्वारस्य असलेला हा पक्ष हे प्रकार करतात आणि दुखावला गेलेला सर्वसामान्य माणूस जेथे जातो तेथे आपला संताप घेऊन जातो. त्यामुळेच आपल्याला भाजपच्या राजकारणाचा तिटकारा आहे. भाजप राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या भावना दुखावत आहे, असेही गांधी म्हणाले.