केंद्रात सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांच्या सध्या जोरदार जाहीराती सुरु आहेत. यावरुन काँग्रेसने टीका केली असून हे तर सतत भुंकणारे सरकार आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.


खर्गे म्हणाले, एनडीए आणि युपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीची तुलना केल्यास आम्हीही शेतकऱ्यांसाठी भरपूर कामे केली. मात्र, या कामांचा कधी डांगोरा पिटला नाही उलट कामे करीतच राहिलो. त्यामुळेच आमच्यावर नेहमी मौनी आणि मुके सरकार असा आरोप होत राहिला. मात्र, मोदी सरकार कोणतेही ठोस काम न करता सातत्याने मोठमोठ्याने आम्ही कामे केल्याचे ओरडून सांगत आहेत, त्यामुळे मोदी सरकार हे भुंकणारे सरकार आहे.

देशाच्या प्रत्येक भागातील शेतकरी मोदी सरकारच्या धोरणांमुळे रडत आहेत. शेतकऱ्यांना शेतमालाचा योग्य भाव मिळत नाहीए. त्याचबरोबर वाढत्या महागाईमुळे त्यांना दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण बनले आहे. या सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अमर्याद वाढ होत आहे. मात्र, सध्याचे सरकार आकड्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही खर्गे यांनी केला आहे.

खर्गे म्हणाले, युपीए सरकारमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीसंदर्भातील धोरणं प्रामाणिकपणे लागू करण्यात आली होती. मात्र, हे सरकार तर खोट्यावर खोटे बोलत आहे. भाजप शासित राज्यांमध्ये काय सुरु आहे, हे जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही.

दरम्यान, देशातील सात राज्यांतील शेतकरी संघटना मोदी सरकारच्या विरोधात आंदोलने करीत आहेत. शनिवारी काही शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन करताना रस्त्यावर हजारो लिटर दूध ओतून दिले. त्याचबरोबर फळे आणि भाज्यांची विक्री रोखून धरली होती.