साप, नाग असे हे शब्द जरी उच्चारले तरीही आपल्या अंगावर काटा उभा राहतो. साप किंवा नाग जर लोकवस्तीत आला तर त्याला पकडून जंगलात सोडण्यासाठी सर्पमित्रांना बोलावले जाते. अनेक साप अनेक सर्पमित्रांनी पकडून जंगलात सोडले असेल. मात्र ओदिशाचा एक तरूण असा आहे की ज्याने आजवर थोड्या थोडक्या नाही तर तब्बल ५ हजार सापांना जीवनदान दिले आहे. कृष्ण चंद्र गोछायत असे या तरूणाचे नाव आहे. कृष्ण चंद्रने सांगितले की त्याने आत्तापर्यंत ५ हजार सापांसह, वाघ, बिबळ्या, हरीण, हत्ती, चिमणी, माकडे यांसारख्या प्राण्यांनाही जीवदान दिले आहे. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

वन्य प्राणी मला माझे मित्र वाटतात. त्यांच्यावर काही संकट आले असेल किंवा ते जखमी असतील तर त्यांचा जीव वाचवणे हे मी माझे कर्तव्य मानतो. जंगल आणि त्यात राहणारे वन्य प्राणी नसतील तर माणसाचे आयुष्य धोक्यात येईल. म्हणून मी मला ज्या परिने जमेल त्या परिने वन्य जीवांची काळजी घेत असतो. संकटात अडकलेल्या प्राण्यांची सुटका करून किंवा जखमी प्राण्यांवर उपचार करून मला आंतरीक समाधान मिळते असेही कृष्ण चंद्रने सांगितले.