‘जय श्रीराम, जय हनुमान’ म्हणण्याची सक्ती करीत जमावाने रात्रभर केलेल्या मारहाणीत तबरेज अन्सारी (वय २४) या तरुणाचा मृत्यू ओढवल्याचे तीव्र पडसाद उमटले असून पोलिसांनी सोमवारी तीनजणांना अटक केली आहे.

या झुंडबळीप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, अटक झालेल्या  पप्पू मंडल या एकाचेच नाव जाहीर करण्यात आले आहे. त्याला झालेली अटकही मारहाणीच्या चित्रफितीवरून आहे. ही चित्रफीत पसरवून जातीय भावना भडकावल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

तबरेज हा चोरीच्या उद्देशाने सरायकेला- खारस्वान येथील एका घरात शिरल्याचे आता सांगितले जात आहे. तो घरात घुसला तेव्हा घरातील लोकांना जाग आली. त्यांनी त्याला पकडले, पण त्याचे साथीदार पळून गेले. क्रौर्याचा कळस म्हणाजे, रात्रभर खांबाला बांधून लाठय़ा-काठय़ांनी मारहाण करीत ‘जय श्रीराम, जय हनुमान’ म्हणण्यास त्याला भाग पाडत असल्याची ध्वनिचित्रफीत मारहाण करणाऱ्यांनीच चित्रित केली.

ही चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर देशभर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. ‘हाच नवा भारत आहे का,’ असा सवाल विरोधकांनी केला. या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी राज्यसभेतही उमटले. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ‘‘मोदीजी, तुमचा नवा भारत तुमच्याकडेच राहू द्या, आम्हाला जुना भारत हवा आहे,’’ असा टोला काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी लगावला. तर, सर्वाचा विश्वास जिंकण्याची ही पद्धत कोणती, असे ट्वीट जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केले.

तबरेजची पत्नी शाइस्ता परवीन हिने मात्र तबरेजवर चोरीचा आळ जाणीवपूर्वक घेतला गेल्याचा आरोप केला. दोन मित्रांसह तबरेज जमशेदपूरहून परत येत असताना जमावाने त्याला सरायकेला-खारस्वान जिल्ह्य़ातील धटकिडी खेडय़ात पकडले. अन्सारीचे मित्र जमावाच्या तावडीतून निसटले, परंतु जमावाने तबरेजवर मोटारसायकल चोरीचा आळ घेऊन खांबाला बांधले आणि रात्रभर लाठय़ा-काठय़ांनी मारहाण केली. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी तक्रार शाइस्ता हिने केली. तिने अनेक आरोपींची नावेही पोलिसांना दिली आहेत.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर रुग्णालयात नेले असते तर त्याचे प्राण वाचले असते. पण पोलिसांनी चांगल्या रुग्णालयात नेण्यास चार दिवस घेतले, असा आरोपही तिने केला.

पोलिसांची संथगती

सोमवारी १७ जूनला तबरेजला मारहाण झाली. त्याला जखमी अवस्थेत मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले गेले. मात्र त्याला लगेच रुग्णालयात न नेता प्रथम पोलीस ठाण्यात नेण्यात आले. नंतर रुग्णालयात नेले गेले.  त्याला जमशेदपूरच्या टाटा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तब्बल चार दिवसांनंतर म्हणजे शनिवारी त्याला पोलिसांनी टाटा रुग्णालयात नेले तेव्हा त्याला डॉक्टरांनी दाखल होण्याआधीच मृत झाल्याचे घोषित केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या कारवाईच्या संथगतीवरही जोरदार टीका होत आहे.

काय घडले?

१७ जून : तबरेजला जमावाची मारहाण आणि रामनाम घेण्याची सक्ती

१८ जून : पोलीस सकाळी घटनास्थळी. तबरेजला चोरीच्या गुन्ह्य़ाखाली अटक. मात्र तुरुंगात प्रकृती बिघडताच त्याला रुग्णालयात नेले. त्यानंतर जमशेदपूरच्या टाटा मेन हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले गेले.

२२ जून : टाटा रुग्णालयात आणताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नरेंद्र मोदीजी, तुमचा नवा भारत तुमच्याकडेच ठेवा आणि प्रेमाची संस्कृती असलेला आमचा जुना भारत आम्हाला परत द्या. जुन्या भारतात द्वेष, क्रोध आणि झुंडबळींचे प्रकार नव्हते. मोदींच्या नव्या भारतात माणसे माणसांना घाबरतात. महात्मा गांधी यांच्या खुन्याचा उदो उदो करणारेच सत्ताधारी पक्षात आहेत. द्वेष आणि झुंडशाहीने कळस गाठला आहे.

– गुलाम नबी आझाद, काँग्रेस नेते