जीवसृष्टीची शक्यता, आकार-तापमान यांची पृथ्वी व शुक्राशी तुलना

आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या पथकाने पृथ्वीसारखे तीन बाहय़ ग्रह शोधून काढले असून सौरमालेबाहेर जीवसृष्टीची शक्यता असलेल्या ग्रहात त्यांचा समावेश आहे. हे तीन ग्रह बटू ताऱ्याभोवती फिरत असून तो तारा त्यांच्यापासून ३९ प्रकाशवर्षे दूर आहे. या ग्रहांचा आकार- तपमान यांची तुलना पृथ्वी व शुक्राशी होऊ शकते असे ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात म्हटले आहे. सौरमालेबाहेर रसायनांचे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे बेल्जियमच्या लीज विद्यापीठाचे खगोल भौतिकशास्त्रज्ञ मायकेल गिलॉन यांनी म्हटले आहे. सर्व तीन ग्रह हे पृथ्वीच्या आकाराचे असून ते वसाहतयोग्य असण्याचा दावा करण्यात आला आहे.

वसाहतयोग्य ग्रहांच्या क्षेत्रात हा मोठा शोध असून गिलॉन व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिली येथील दुर्बिणीच्या मदतीने या ग्रहांचा शोध घेतला. या दुर्बिणीचे नाव ट्रॅपिस्ट असे असून तिच्या मदतीने बटूतारे शोधता येतात व ते तारे असे असतात जे प्रकाशीय दुर्बिणीतून दिसू शकणार नाहीत इतके अंधूक असतात.

सूर्याच्या एक अष्टमांश आकाराच्या ट्रॅपिस्ट-१ आकाराच्या ताऱ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून तो सूर्यापेक्षा थंड तारा आहे. खगोलवैज्ञानिकांनी काही महिने अवरक्त किरण संदेशांचा अभ्यास केला असता हे तीन बाहय़ग्रह या ताऱ्याभोवती सापडले असून ते आपल्या सौरमालेबाहेरच्या ताऱ्याभोवती फिरत आहेत. दोन ग्रह ताऱ्याभोवती दीड व २.४ दिवसांत प्रदक्षिणा करीत असून त्यांच्यावर ताऱ्याकडून येणारी प्रारणे अनुक्रमे सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या प्रारणांच्या चार व दोन पट आहेत. आतापर्यंत थंड बटू ताऱ्याभोवती वसाहतयोग्य ग्रह असण्याचा सिद्धांत खरा मानला जात नव्हता, पण आता तसे तीन ग्रह सापडले आहेत, असा दावा लीज विद्यापीठाचे इमॅन्युअल जेहिन यांनी केला आहे. हा क्रांतिकारी शोध असून विश्वात दुसरीकडे जीवसृष्टी असण्याची शक्यता त्यातून दिसत आहे.

कमी तीव्रतेच्या ताऱ्याभोवती हे तीन ग्रह फिरत असून तेथे वसाहतयोग्य तपमानाचे भाग असू शकतात जेथे पाणी द्रवरूपात राहू शकते. हे ग्रह लहान ताऱ्याच्या जवळ असूनही तेथे वातावरण असू शकते, असे एमआयटीचे ज्युलियन द विट यांनी म्हटले आहे. या ग्रहांच्या शोधाने दुसरीकडे जीवसृष्टी शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.