काठमांडू : भारतातून नेपाळमध्ये गेलेल्या तीन भारतीयांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ते धार्मिक कार्यक्रमासाठी गेले आहेत.ते एका मशिदीत राहत होते. त्यांच्या चाचण्या सकारात्मक आल्या असून ते काठमांडूपासून दक्षिणेला १३५ कि.मी. अंतरावर असलेल्या बीरगंज शहरात एका मशिदीत वास्तव्यास होते.

दरम्यान करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नेपाळमधील टाळेबंदी आता १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. नेपाळमध्ये आणखी तीन रुग्ण आढळून आल्याने एकूण संख्या १२ झाली आहे.

प्राथमिक वृत्तानुसार या तिघांचे नमुने काठमांडूतील राष्ट्रीय आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते, ते सकारात्मक आले असून तीन भारतीय नागरिक हे मार्चमध्ये सप्तारी जिल्ह्य़ात धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे नेपाळ व भारतातील शेकडो लोक सहभागी होते. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने मशिदीत राहणाऱ्या २६ जणांना ताब्यात घेत विलगीकरणात ठेवले आहे.

टाळेबंदीच्या मुदतीत वाढ

नेपाळ  सरकारने ६ एप्रिलला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत टाळेबंदीची मुदत वाढवली आहे. पश्चिम नेपाळमध्ये स्थानिक संक्रमणाचा पहिला रुग्ण सापडला होता. नेपाळमध्ये आधी टाळेबंदी ७ एप्रिलपर्यंत होती तर आता ती १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.