जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आल्यापासून चवातळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर रोष व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानच्या बरोबरीने दहशतवादी संघटना देखील भारतविरोधी कारवाया करण्यासाठी अधिकच सक्रीय झाल्या असल्याचे दिसत आहेत. पाकिस्तानी सैन्याकडूनही भारतात घातपात घडवण्यासाठी या दहशतवादी संघटनांना पाठबळ दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, पाकिस्तानी सेना व आयएसआयच्या मदतीने लश्कर ए तैयबा (एलइटी), हिजबुल मुजाहिद्दीन(एचएम) आणि जैश ए मोहम्मद (जेएम) या प्रमुख दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरसह भारताच्या अन्य काही भागात दहशतवादी कारवायांसाठी एकत्र येत जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात दिलेल्या वृत्तानुसार, एका पत्रकाद्वारे माहिती मिळाली आहे की, मागील आठवड्यात पुलवामा येथे या दहशतवादी संघटनांची एक बैठक पार पडली. या बैठकीत भारतातील कारवायांसंदर्भात जबाबदाऱ्या आपसात वाटून घेण्यात आल्या आहेत.
गुप्तचर संस्थांकडून प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानचे पाठबळ असलेल्या या दहशतवादी संघटनांना जम्मू-काश्मीरसह भारतातील काही भागात हल्ले करणे, याचबरोबर पोलीस कर्मचारी व राजकीय नेत्यांची हत्या घडवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ‘जेएम’ वर राष्ट्रीय महामार्गावर हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ‘एलइटी’ ला अंतर्गत सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्यास सांगितले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनवर काश्मीर खोऱ्यात बंद घडवण्याबरोबरच पोलीस व नेत्यांची हत्या करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती मिळालेली आहे. याचबरोबर स्थानिक लोकांना लक्ष्य करत जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण केली जाणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर दहशतावादी संघटनांचे प्रयत्न अयशस्वी ठरवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय स्थानिक पोलीस व भारतीय सेनेच्या जवानांनामध्ये कायम समन्वय राखण्यासही सांगण्यात आले आहे.
डीजीपी दिलबाग सिंह यांनी मागील आठवड्यातच सांगितले होते की, लश्कर ए तैयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश ए मोहम्मद या तिन्ही संघटना जम्मू-काश्मीरमधील स्थानिक लोकांना भडवकवण्याचे तसेच त्यांच्यावर दबाव टाकण्याचे काम करत आहे. या संघटनांकडून येथील नागरिकांना दुकानं तसेच पेट्रोल पंप देखील बंद करण्यास भाग पाडले जात होते.