जम्मू- काश्मीर मधील हंदवारा येथे रविवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये एका नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला. सध्या दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमक थांबली असून परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शनिवारी शोपिया येथेही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. पण अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली होती.

तत्पूर्वी, शुक्रवारी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. यात एक भारतीय जवान जखमी झाला होता. दि. ५ डिसेंबरलाही पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करून भारतीय लष्कराचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास मदत केली जाते, असे सांगण्यात येते.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांत चकमकींमध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. अनेकांना जिवंत पकडण्यात यश आले असून त्यांची चौकशी केली जात आहे.