दक्षिण दिल्लीतील फिलांज गावात तीन वर्षांच्या बालिकेवर शेजाऱ्याने बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर बालिकेवर सफदरजंग रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. बालिकेवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या एका फेरीवाल्याच्या घरात हा प्रकार घडला. पीडित बालिकेची आईही काही कामानिमित्त घराबाहेर गेली असल्याचा फायदा उठवत बालिकेवर बलात्कार केला. फेरीवाल्याची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने दोघांनाही कामासाठी बाहेर जावे लागते, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी हा शेजारी राहणाराच आहे, असे पीडित बालिकेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केले असून लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, असे सांगण्यात आले.