जयपूर, भोपाळ, अहमदाबाद

देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र या राज्यांमध्ये मंगळवारी रात्री वादळीवाऱ्यांसह झालेल्या पावसाने एकूण ५० बळी घेतले असून या अवकाळी पावसात गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठे नुकसान झाले.

वादळी पावसामुळे राजस्थानात सर्वाधिक २१, मध्य प्रदेशात १५ तर गुजरातेत १० व महाराष्ट्रात तीन जण ठार झाले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना  प्रत्येकी २ लाख, तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रूपये मदत देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले.

भोपाळमध्ये इंदोर, धार, शाजापूर येथे प्रत्येकी तीन, तर रतलामला दोन , अलिराजपूर, राजगड, सिहोर व छिंदवाडा जिल्ह्य़ात प्रत्येकी एक जण ठार झाला आहे. उत्तर गुजरात व सौराष्ट्र या भागांना फटका बसला असून उत्तर गुजरातमध्ये पाऊस, वादळ व विजा पडून सर्वाधिक बळी गेले आहेत. राजस्थानात अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब कोसळले आहेत.

नैसर्गिक आपत्तीतही आरोप प्रत्यारोप

पंतप्रधान मोदी यांनी सकाळीच ट्विटरवर गुजरातमध्ये पावसाने झालेल्या हानीबाबत सहवेदना व्यक्त करीत  गुजरातला मदतही जाहीर केली. त्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी, पंतप्रधानांना केवळ गुजरातचा कळवळा असल्याचा आरोप केला.

कमलनाथ यांनी सांगितले,की मोदी यांना त्यांच्या गुजरात राज्याचाच कळवळा आहे. त्यामुळे त्यांनी त्या राज्यातील हानीबाबत उल्लेख केला. ‘मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे नाही. मध्य प्रदेशातही अवकाळी पावसाने १० जण मरण पावले आहेत, पण तुम्ही गुजरातबाबत सहवेदना व्यक्त केली. मध्यप्रदेशात तुमचे सरकार नसले तरी येथेही देशाचे नागरिकच राहतात.’ अशी टीका कमलनाथ यांनी केली.

पंतप्रधान कार्यालयाने नंतर ट्विट संदेशात असे म्हटले की, मध्य प्रदेश, राजस्थान, मणिपूर व देशाच्या विविध भागात पावसाने झालेल्या हानीबाबत पंतप्रधानांनी दु:ख व्यक्त केले असून सरकार या वादळी पावसाचा फटका बसलेल्या सर्वानाच मदत देण्याचा प्रयत्न करील. भाजपने कमलनाथ यांच्या आरोपाला उत्तर देताना सांगितले,की ते वादळी पावसाने झालेल्या हानीच्या मुद्दय़ावर राजकारण करीत आहेत. भाजप माध्यम विभागाने तसेच राज्य सभा  खासदार अनिल बलुनी यांनी दिल्लीत सांगितले,की कुठलीही नैसर्गिक दुर्घटना ही राज्याने केंद्राला कळवायची असते. त्यातील हानी सांगायची असते, नंतर मदत जाहीर केले आहे. तसे न करता कमलनाथ यांनी ट्विट करून राजकारण सुरू केले आहे.