ब्रिटनच्या एका न्यायालयाने दिलेला निकाल विजय मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी महत्वाचा ठरु शकतो. ब्रिटनच्या या न्यायालयाने तिहार कारगृह सुरक्षित असल्याचे सांगत भारतातून फरार झालेल्यांना तिथे प्रत्यार्पण होऊ शकते असे म्हटले आहे. मॅच फिक्सिंगचा आरोपी संजीव चावलाच्या खटल्यात आलेला हा निर्णय भारतातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून गेलेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी महत्वाचा ठरु शकतो.

लंडन उच्च न्यायालयाचे न्या. लेगाट आणि न्या. डिंगेमॅन्स यांनी शुक्रवारी निर्णय देताना तिहार कारागृहात भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक संजीव चावला याला कोणताही धोका नाही, असे म्हटले. संजीव चावलावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना निश्चितीचा आरोप आहे. हॅन्सी क्रोनिए सामना निश्चितीचे हे प्रकरण आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा आणि मोहम्मद अझहरुद्दीन यांच्यावरही आरोप होते.

भारताकडून चावलाच्या उपचारासाठी भरवसा मिळाल्यानंतर लंडन उच्च न्यायालयाने आपले हे मत व्यक्त केले. लंडन उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम विजय मल्ल्याच्या प्रकरणावरही पडू शकतो. कारण विजय मल्ल्या नेहमी भारतातील कारागृह असुरक्षित असल्याचे सांगत आला आहे. या निर्णयामुळे ब्रिटिश न्यायालयाकडून त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळू शकते.

याप्रकरणी नव्या निर्णयासाठी हे प्रकरण वेस्ट मिनिस्टर न्यायालयात हस्तांतर होईल. ब्रिटनचे विदेश मंत्री चावलाच्या प्रत्यार्पणासंबंधी निर्णय घेतील. परंतु, त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. इतकेच नव्हे तर त्यानंतरही लंडनच्या सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकते.