लष्करप्रमुख जनरल रावत यांचे प्रतिपादन

संवेदनशील प्रदेशात कारवायांसाठी सेनादलांना विशेष अधिकार प्रदान करणाऱ्या आम्र्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅक्टबाबत (‘अफ्स्पा’) फेरविचार करण्याची अद्याप वेळ आलेली नाही, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले.

संरक्षण आणि गृहमंत्रालयांमध्ये ‘अफ्स्पा’ रद्द करण्यावरून किंवा त्याच्या काही तरतुदी सौम्य करण्यावरून गेल्या काही दिवसांत अनेक बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्या पाश्र्वभूमीवर रावत यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे.

या कायद्यामुळे लष्कराला जम्मू-काश्मीर तसेच ईशान्येकडील अशांत क्षेत्रात कारवाईची मुभा मिळते. तसेच या काद्यान्वये तेथे तैनात असलेल्या जवानांना पोलीस कारवाईविरुद्ध संरक्षणही मिळते. मात्र  लष्कराकडून या कायद्याचा गैरवापर होत असून मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे हा कायदा रद्द किंवा सौम्य करण्याची मागणी होत आहे. मात्र रावत यांनी लष्कर अशांत क्षेत्रात कारवाया करताना नागरिकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेत असल्याचे म्हटले आहे.