रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी अडचणीत आले आहेत. टाइम्स समूहाने अर्णव गोस्वामी यांच्यावर काँटेट चोरीचा आरोप केला आहे. नुकतेच रिपब्लिक टीव्हीने दोन मोठे खुलासे करण्याचा दावा केला होता. राष्ट्रीय जनता दल प्रमूख लालूप्रसाद यादव हे तुरूंगात असलेल्या शाहबुद्दीन याच्याशी चर्चा करत असल्याचा दावा रिपब्लिकन टीव्हीने ऑडिओ टेप्सच्या माध्यमातून केला होता. तर दुसरीकडे सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूवरही एक ऑडियो टेप असल्याचा दावा केला होता. यामध्ये रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकार प्रेमा श्रीदेवी सुनंदा पुष्कर यांच्याशी बोलताना दाखवण्यात आले आहे. ज्यावेळी ही चर्चा झाली त्यावेळी प्रेमा श्रीदेवी या टाइम्स समूहाच्या पत्रकार होत्या. या दोन ऑडिओ टेप्सवरून टाइम्स नाऊची प्रमुख कंपनी बीसीसीएलने अर्णव यांच्यावर काँटेंट चोरीचा आरोप केला आहे.

बीसीसीएलने मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात अर्णव आणि प्रेमा श्रीदेवी यांच्यावर कॉपीराइट्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला असून गुन्हा दाखल झाला आहे. अर्णव गोस्वामी आणि प्रेमा श्रीदेवी जेव्हा टाइम्समध्ये कामाला होते, तेव्हा त्यांच्याकडे या ऑडिओ टेप्स होत्या, असा दावा बीसीसीएलने केला आहे. दि. ८ मे २०१७ रोजी सुनंदा पुष्कर ऑडिओ टेप्स प्रसारित झाल्या. त्यावेळी या दोघांनी या टेप्स आपल्याकडे दोन वर्षांपासून आहेत, असे म्हटल्याचे बीसीसीएलने निर्दशनास आणून दिले. त्यावेळी हे दोघेही टाइम्स समूहाचे कर्मचारी होते.

अर्णव आणि श्रीदेवी यांनी जाणूनबुजून टाइम्स नाऊ वाहिनीच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याचे बीसीसीएलने आपल्या तक्रारीत म्हटल्याचे सांगण्यात येते.