इटानगर : १९६२च्या युद्धात चीनचा विजय झाला होता पण आता परिस्थिती वेगळी आहे. चीनने अरुणाचलवर कितीही वेळा दावा केला, तरी भारतीय लष्कर व आमच्या राज्यातील लोक तो कधीही मान्य करणार नाहीत, वेळ पडल्यास आम्ही भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढू, असे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सांगितले.

भारत-तिबेट सीमेवर बुमला खिंडीत आयोजित कार्यक्रमात त्यांनी भारत-चीन युद्धात १९६२ मध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. त्या वेळी ते म्हणाले, ‘हे १९६२ नाही २०२० आहे. सगळ्या गोष्टी आता बदलल्या आहेत. जम्मू-काश्मीरपासून अरुणाचलपर्यंत आम्ही सुसज्ज आहोत. जर वेळ पडली तर अरुणाचलचे लोक भारतीय लष्कराच्या पाठीशी उभे राहतील.’

चीनने अजूनही अरुणाचल हा भारताचा प्रदेश असल्याचे मान्य केलेले नाही. तो दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे म्हटले आहे. तो दावा भारताने नेहमीच फेटाळला आहे.

१९६२ नंतरच्या गेल्या सहा दशकांतील बदलांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले, ‘सीमा भागात पायाभूत विकास बराच झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकारातून हे सगळे घडून आले आहे. सीमा भागातील विकासात रस्त्यांचे महत्त्व असते. अरुणाचल प्रदेशात रस्ते बांधणीची कामे चालू आहेत.’

काही देश शक्तीशाली असल्याचा समज खोडून काढला- रेड्डी

बृहत नॉइडा : काही देशांचे लष्कर शक्तिशाली आहे हा समज इंडो- तिबेट सीमा पोलिस दलाने (आयटीबीपी) खोटा ठरवला आहे,असा टोला गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी चीनचे नाव न घेता लगावला आहे.  त्यांनी लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या संघर्षांबाबत हे वक्तव्य केले.