आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी आणि समविचारी पक्षांच्या मतांमध्ये विभागणी होऊ नये यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बेचैन झाले आहेत. वारंवार आघाडीसाठी विचारुनही काँग्रेस प्रतिसाद देत नसल्याने ते आता काहीसे निराश झाले आहेत. बुधवारी दिल्लीतील चांदणी चौकात झालेल्या एका सभेमध्ये त्यांनी आपली हतबलता बोलून दाखवली.

जर आज काँग्रेससोबत आमची आघाडी झाली तर भाजपा दिल्लीतील सर्व जागा हारेल त्यामुळे काँग्रेसला आघाडीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्यांनी यासाठी नकार दिला आहे. काँग्रेसला वारंवार विचारुन मी आता थकलो, मला कळतच नाहीए की त्यांच्या मनात काय सुरु आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

काँग्रेसने उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमध्ये फूट पाडली आहे. काँग्रेस दुसऱ्या पक्षांना कमजोर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या सर्व जागांवर आम आदमी पार्टी एकट्यानेच निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.