News Flash

तृणमूल खासदार नुसरत जहाँ प्रचाराला वैतागल्या? म्हणे, “मी मुख्यमंत्र्यांसाठीही एवढा प्रचार करत नाही!”

तृणमूल खासदार नुसरत जहाँ यांच्या वक्तव्यावरून भाजपानं तृणमूल काँग्रेसला ट्रोल करायला सुरुवात केली आहे!

नुसरत जहाँ यांनी प्रचारसभेदरम्यान केलेल्या वक्तव्यावर भाजपाकडून खोचक टीका केली जात आहे.

सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे. ममता दीदी विरुद्ध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह असा हा सामना असल्यामुळे यात अधिकत चुरस निर्माण झाली आहे. पण पश्चिम बंगालमध्ये यंदा मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी मंडळी प्रचाराला उतरली आहेत. त्यात तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची जोरदार चर्चा आहे. ग्लॅमरचा तडका सोबत घेऊन Nusrat Jahan प्रचार करत असताना सोमवारी मात्र त्या चांगल्याच वैतागल्या. एवढंच नाही, तर आपल्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यावर त्या चांगल्याच वैतागल्या. म्हणाल्या, “मी मुख्यमंत्र्यांसाठीही एवढा प्रचार करत नाही!” आणि अपेक्षप्रमाणे भाजपानं हे आयतं कोलीत हातात धरून सोशल मीडियावर तुफान फिरवायला सुरुवात केली आहे!

नेमकं झालं काय?

नुसरत जहाँ यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. खुद्द भाजपाने आपल्या पश्चिम बंगालच्या ट्वीटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसलं, तरी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती या नुसरत जहाँच आहेत, हे स्पष्ट होत आहे.

तर या व्हिडीओमध्ये नुसरत जहाँ यांना पक्षाचा एक कार्यकर्ता अजून थोडा वेळ प्रचारात थांबण्याची विनंती करताना दिसत आहे. पण नुसरत जहाँ मात्र ऐकायला तयार नाहीत. “मेन रोड आता जवळच आहे. इथून फक्त अर्धा किलोमीटर. फक्त थोडा वेळ थांबा”, अशी विनंतीवजा याचना करताना हा कार्यकर्ता व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. पण नुसरत जहाँ मात्र तिथून निघण्यावर ठाम होत्या.

“तासभर प्रचार करतेय!”

या कार्यकर्त्याच्या विनंतीमुळे अखेर वैतागलेल्या नुसरत जहाँ यांनी आपला रोष व्यक्त केलाच. “मी गेला जवळपास तासभर प्रचार करते आहे. मुख्यमंत्र्यांसाठीही मी एवढा वेळ प्रचार करत नाही”, असं म्हणत नुसरत जहाँ ‘घटनास्थळावरून’ निघून गेल्या आणि कार्यकर्ते नाराज झाले.

 

भाजपानं रविवारी संध्याकाळी आपल्या ट्वीटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या त्यासोबत नुसरत जहाँ यांचं वाक्य टाकून पुढे #MamataLosingNandigram अर्थात ममता बॅनर्जींच्या हातून नंदीग्राम निसटत आहे, अशा आशयाचा हॅशटॅग देखील पुढे टाकण्यात आला आहे. त्यावरून तरी हा व्हिडीओ खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघातला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

२ मे रोजी निकाल लागणार!

पश्चिम बंगाल निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं असून उरलेल्या ७ टप्प्यांचं मतदान २९ एप्रिल रोजी संपणार आहे. २ मे रोजी पश्चिम बंगालसोबतच आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीचे देखील निकाल जाहीर केले जातील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 4:50 pm

Web Title: tmc mp nusrat jahan dont do this for cm statement mamata banerjee pmw 88
Next Stories
1 माजी मुख्यमंत्री देशासाठी धोका? पासपोर्ट अर्ज फेटाळला गेल्यावर मेहबुबा मुफ्ती यांचा सवाल
2 एस जयशंकर यांच्यासोबत कोणतीही बैठक अद्याप ठरली नाही, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे स्पष्टीकरण
3 डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार हा असू शकतो कोविड – १९ चा स्रोत
Just Now!
X