टीएमसीचा अर्थ ट्रान्सफर माय कमिशन असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरुलिया येथील रॅलीला संबोधित करताना मोदींनी टीएमसी तसंच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला. टीएमसीने बंगालमध्ये माओवाद्यांची नवी जात निर्माण केल्याचंही ते म्हणाले आहेत.

“ही भूमी प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या वनवासाची साक्षीदार आहे. या भूमीवर सीताकुंड आहे. जेव्हा सीतामाता तहानेने व्याकुळ होती तेव्हा प्रभू श्रीरामांनी जमिनीवर बाण मारुन पाणी काढलं होतं अशी कथा आहे. आणि याच पुरुलियामध्ये पाण्याची समस्या असणं विडंबना आहे,” असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

नरेंद्र मोदींनी यावेळी ममता बॅनर्जींचं सरकार पुरुलियाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. “आधी डावे आणि नंतर टीएमसी सरकारने पुरुलियामध्ये उद्योग येऊ दिले नाहीत. सिंचनासाठी ज्या पद्दतीचं काम व्हायला हवं होतं तसं काम झालं नाही. पाण्याची कमतरता असल्याने रोज ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्याची मला कल्पना आहे. टीएमसी सरकार आपल्या खेळात व्यस्त असून शेतीकडे दुर्लक्ष करत आहे,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

पुढे ते म्हणाले की, “पश्चिम बंगालमधील जनता इतकी वर्ष चुकीच्या पद्धतीने सरकार चालवल्याची ममता बॅनर्जी यांना शिक्षा देईल. दीदी म्हणतात ‘खेला होबे’, पण भाजपा म्हणतं ‘विकास होबे’, ‘शिक्षा होबे’. टीएमसीने नवे माओवादी निर्माण केले आहेत ज्याचं काम जनतेचा पैसा लुटणं इतकंच आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.

“बंगालने आपला निर्णय घेतला आहे, लोकसभेत टीएमसी हाफ आणि यावेळी पूर्ण साफ असं ते म्हणत आहे. हा निर्धार पाहता ममता बॅनर्जी माझ्यावर सगळा राग काढत आहेत. पण माझ्यासाठी देशातील करोडो मुलींप्रमाणे त्या आहेत. त्यांचा आदर करणं आपल्या संस्कृतीचा भाग आहे. म्हणून त्यांच्या पायाला जखम झाली तेव्हा आम्ही चिंता व्यक्त केली. त्यांनी लवकर बरं व्हावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असं मोदी म्हणाले आहेत.