प्रवासाच्या वेळेत बचत व्हावी, यासाठी आता राजधानी आणि शताब्दी या एक्स्प्रेस गाड्यांना दोन इंजिने लावण्यात येणार आहेत. दोन इंजिनांमुळे गाडीच्या वेगात लक्षणीय फरक पडणार असल्याने रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या दोन इंजिनांपैकी एक इंजिन गाडीला नेहमीप्रमाणे पुढून ओढेल, तर दुसरे इंजिन गाडीला मागून धक्का देईल. यामुळे गाडीने वेग पकडताना किंवा वेग कमी करतेवेळी लागणाऱ्या वेळेत बचत होणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात ‘मिशन रफ्तार’ या योजनेची घोषणा केली होती. या योजनेतंर्गत अभिनव पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात गाड्यांचा वेग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. दरम्यान, दुहेरी इंजिनामुळे राजधानी एक्स्प्रेस मुंबईत नेहमीपेक्षा एक तास लवकर पोहचेल, असा रेल्वे प्रशासनाचा अंदाज आहे. मुंबई-पुणे या घाटातील रेल्वेमार्गावरून प्रवास करताना मालगाड्यांसाठी अशाप्रकारच्या ‘पूश अँड पूल’ पद्धतीचा वापर करण्यात येतो. हीच पद्धत आता राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेससाठी वापरण्यात येणार आहे. मात्र, ही दोन इंजिने जोडताना गाडीतील अंतर्गत वीजपुरवठ्यासाठी वापरण्यात येणारे दोन डबे (पॉवर कार्स) काढून टाकण्यात येणार आहेत. त्याऐवजी गाडीला जास्तीचे डबे जोडण्यात येणार असून त्यामुळे जास्त प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे.