संरक्षण सामुग्रीच्या खरेदीत भारताशी बरोबरी करण्यासाठी अमेरिकेकडून आणखी काही एफ-१६ विमाने खरेदी करण्याचा पाकचा इरादा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील आठ एफ-१६ जेट विमानांचा करार सध्या प्रलंबित असून येत्या काही दिवसांतच ही विमाने पाकिस्तानला मिळतील. यानंतर पाकिस्तानकडून आणखी दहा विमानांचा प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवण्यात येणार असल्याचे समजते.
अमेरिकेचा भारताला ठेंगा! 
‘जेन्स डिफेन्स वीकली”च्या वृत्तानुसार पाकिस्तानला नागरी वस्त्यांमध्ये अचानकपणे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्यावेळी उपयुक्त ठरू शकणारी १६सी/डी ब्लॉक मल्टी रोल फायटर्स विमानांची गरज आहे. या प्रस्तावाला तत्वत: मान्यता मिळाली असली तरी या खरेदीची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. २०२० पर्यंत पाकिस्तानी हवाई दलातील १९० विमाने निवृत्त होणार आहेत. हीच कमतरता भरून काढण्यासाठी पाकला या नव्या विमानांची गरज आहे. काही दिवसांपूर्वी एफ १६ विमानांच्या अमेरिकेने पाकिस्तानला केलेल्या विक्रीबाबत भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकने काँग्रेसकडूनही पाकला एफ १६ विमाने देण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान फ्रान्स आणि रशिया या दोन देशांकडून विमान खरेदी करण्याचाही विचार करत आहे.