आजपासून या राज्यासाठी नवा अध्याय सुरू होत आहे. मी नागरिकांना विश्वास देतो की, कोणाचाही अपेक्षाभंग होणार नाही. सर्वांची काळजी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमेंत सोरेन यांनी राज्यात त्यांची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर पत्रकारपरिषदेत व्यक्त केली.

यावेळी बोलताना हेमंत सोरेन म्हणाले की, आज लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस आहे. हा विजय शिबू सोरेन यांच्या परिश्रमांमुळे दिसत आहे. राजद – काँग्रेसने आमच्याबरोबर निवडणुक लढवली, ज्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. उद्देशासाठी या राज्याची निर्मिती करण्यात आली होती, तो पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पुढील धोरण सहकारी पक्षांशी चर्चा केल्यानंतर निश्चित होईल, यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींचे आभार व्यक्त केले. बहुमत मिळत असल्याचे व राज्यात आपले सरकार येत असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्यावर हेमंत सोरेन यांनी आनंद व्यक्त करत, त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात सायकलवर चक्कर देखील मारली.

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात भाजपा सरकारला धक्का देत, झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) काँग्रेस आणि राजद आघाडीला जनतेनं कौल दिला असल्याने राज्यात या आघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, हेमंत सोरेन हे झारखंडचे भावी मुख्यमंत्री असतील हे देखील जवळपास निश्चितच आहे.

दुसराकडे झारखंडमध्ये पाच वर्षे सत्ते असलेल्या भाजपाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत डबल धक्का बसला आहे. सत्तेतून पायउतार व्हावे लागत असलेल्या भाजपाच्या जागाही दुपटीनं घटल्या आहेत. दुपारपर्यंत ३१ जागांवर आघाडीवर असलेली भाजपा अखेरच्या काही फेऱ्या बाकी असताना केवळ २३ मतदारसंघातच आघाडीवर होती. तर काँग्रेस, जेएमएम आणि राजदला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झाले आहे. तब्बल ४७ जागांवर तिन्ही पक्षांचे उमेदवार आघाडीवर दिसत आहेत.