नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाचे इंग्रजी भाषेतील निकाल आता प्रादेशिक भाषेत वाचायला मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालय एका सॉफ्टवेअरचे लवकरच अनावरण करत असून त्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल देशभरातील प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरीत केले जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या सेवेमुळे मराठीमध्येही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उपलब्ध होतील. या सेवेचा प्रारंभ करण्याबाबतची प्रक्रिया सुरू असून हे अ‍ॅप गुगलच्या भाषांतराच्या अ‍ॅपप्रमाणेच असेल. ते एकाचवेळी सगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये निकाल भाषांतरित करेल.

या सेवेच्या सकारात्मक परिणामासाठी सर्वोच्च न्यायालय देशभरातील सर्व उच्च न्यायालयांची मदत घेणार आहे.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाकडून या सेवेचा प्रारंभ केला जाईल. या सेवेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या अप्पू घर येथील नव्या कार्यालयात केले जाणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची ही कल्पना असून त्यांनी या संदर्भात न्यायमूर्ती एस. ए. बोबडेंसह सर्वोच्च न्यायालयातील पत्रकारांशी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात औपचारिक चर्चा केली होती. या वेळी निकाल भाषांतरित करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरले. या सेवेमध्ये केवळ प्रादेशिक भाषांमध्ये निकाल भाषांतरित केले जाणार नाही तर निकालांचा साराशंही उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात वर्षांनुवर्षे दाखल खटल्यांसाठी खेटे घालणाऱ्या याचिकाकर्त्यांना त्याचा फायदा होणार आहे. इंग्रजी भाषेत निकाल असल्याने अनेकदा याचिकाकर्त्यांना ते न समजल्यानेच अनेक खटले सुरू राहतात, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.