२० कोटींची रक्कम जप्त

सीबीआयने रेल्वेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छापे टाकले असून, त्यांच्याकडे रेल्वेगाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ात भ्रष्टाचार करून मिळवलेले २० कोटी रुपये रोख सापडले आहेत. त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यातही त्यांनी भ्रष्टाचार केला असे रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक एम. एस. छालिया व संदीप सिलास यांचा समावेश आहे. सीबीआय म्हणजे गुन्हे अन्वेषण खात्याने उत्तर रेल्वेच्या या दोन माजी अधिकाऱ्यांच्या १३ ठिकाणांवर तसेच इतर सात खासगी आस्थापनांवर छापे टाकले. त्यात वीस कोटी रुपये जप्त करण्यात आले. रेल नीर ही पाण्याच्या बाटल्या पुरवण्याची सेवा रेल्वेमध्ये काही गाडय़ांत दिली जाते. त्यात त्यांनी भ्रष्टाचार व लाचलुचपतगिरी केली. रेल नीर हे आयआरसीटीसीतर्फे रेल्वेगाडय़ांत पुरवले जाते. या रेल्वे कंपनीने रेल नीर म्हणजे पाण्याचे प्रकल्प नांगलोई, दानापूर व चेन्नई व अमेठी येथे सुरू केले होते. चेन्नई येथे १५००० कार्टन रेल नीरचे उत्पादन रोज केले जाते, तर दानापूर येथे ७५०० कार्टन तर नांगलोई येथे ११ हजार कार्टन (खोकी) पाण्याचे उत्पादन केले जाते. एका कार्टनमध्ये १२ बाटल्या असतात.
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्याने सांगितले, की रेल नीर तयार करून ते पुरवणे हे आमचे काम आहे. रेल नीर हे आयआरसीटीसीची सेवा असलेल्या सर्व गाडय़ांमध्ये उपलब्ध आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांना तक्रारींची चौकशी करण्यास सांगितले असून, आयआरसीटीसीच्या वेब बुकिंगचे तांत्रिक लेखापरीक्षण करण्यास सांगितले आहे. कुणालाही यंत्रणेशी खेळ करून असा भ्रष्टाचार करू दिला जाणार नाही व गयही केली जाणार नाही असे प्रभू यांनी सांगितले.
रेल्वेगाडय़ांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना दुय्यम दर्जाचे बाटलीबंद पाणी पुरवल्याचा आरोप आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सात खासगी कंपन्यांवर छापे घालून २० कोटी रुपये जप्त केले आहेत.