देशातील सर्वात वेगवान ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला खिसा देखील खाली करावा लागणार आहे. भारतीय रेल्वेची पहिली इंजिनविरहित आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीची असलेली ट्रेन अर्थात ‘ट्र्रेन-18’ किंवा ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला १५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली ते वाराणसी प्रवासासाठी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यापूर्वी या ट्रेनचे तिकीट दर जाहीर करण्यात आले आहेत.

या ट्रेनमधून दिल्लीहून वाराणसीला एसी डब्ब्यातून प्रवासासाठी १,८५० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. तर एक्झिक्युटिव्ह क्लासमधून प्रवासासाठी ३,५२० रुपये मोजावे लागतील. यामध्ये जेवणाची रक्कम समाविष्ट आहे. तर परतीच्या प्रवासासाठी एसी चेअर कारचं तिकीट १,७९५ रुपये असेल आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ३,४७० रुपये मोजावे लागतील. ‘शताब्दी’च्या तिकीटदरांशी तुलना केल्यास ट्रेन-18 चं चेअरकारचं तिकीट दीडपट आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचं तिकीट १.४ पट अधिक आहे.

प्रवाशांना थेट ड्रायव्हरची केबिनही दिसू शकेल अशी रचना या ट्रेनची आहे. १६ डब्ब्यांच्या या ट्रेनमधील १४ डबे ‘नॉन एक्झिक्युटिव्ह’ तर दोन डबे ‘एक्झिक्युटिव्ह’ असतील. ही ट्रेन येत्या काळात ‘शताब्दी एक्सप्रेस’ची जागा घेईल. सुरुवातीच्या टप्प्यात अशा नऊ रेल्वे देशात वेगवेगळ्या मार्गावर धावतील. ‘एक्झिक्युटिव्ह’ क्लासमधील आसनव्यवस्था फिरती असेल आणि रेल्वे ज्या दिशेनं जातेय, त्या दिशेनं आपलं आसन फिरवता येऊ शकेल. आणीबाणीच्या प्रसंगी चालक दलाशी थेट संपर्काची यंत्रणा रेल्वेत असेल. या रेल्वेत प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही, स्वयंचलित दरवाजे, स्लायडिंग फूटस्टेप्स, वेगवान मोफत वायफाय, इन्फोटेनमेंट, झिरो डिस्चार्ज बायो व्हॅक्युम शौचालयं, जीपीएस प्रणालीद्वारे प्रत्येक प्रवाशाची माहिती, ऊर्जाबचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम अशी अनेक आकर्षक फीचर्स या ट्रेनमध्ये आहेत.