दिल्लीतील निझामुद्दीन मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमासाठी जमून नंतर देशाच्या इतर भागात गेलेल्या तबलिगी जमातच्या लोकांमुळे करोना विषाणू अनेक लोकांमध्ये पसरला, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी  राज्यसभेत सांगितले. मार्चमध्ये दिल्लीतील निझामुद्दीन मरकज येथे तबलिगी जमातीचा धार्मिक मेळावा झाला होता.  पोलिसांनी  दिल्लीत २३३ तबलिगी जमात सदस्यांना अटक केली होती,शिवाय २३६१ लोकांना २९ मार्चपासून मरकजच्या मुख्यालयातून बाहेर काढण्यात आले. रेड्डी म्हणाले,की कोविड -१९ ची मार्गदर्शक तत्त्वे व आदेश लागू असताना बंदिस्त जागेत धार्मिक मेळावा घेण्यात आला. त्यात सामाजिक अंतर पाळण्यात आले नाही. मुखपट्टीचाही वापर केलेला नव्हता. त्यामुळे करोनाचा प्रसार अनेक लोकांमध्ये झाला.